
सावंतवाडी : शहरातील कंत्राटी सफाई कामगारांना त्यांच्या हक्काच्या पगारासाठी वारंवार संपावर जावं लागण हे दुर्दैवी आहे. त्यामुळे तात्पुरता तोडगा न काढता हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवून टाका किंवा कंत्राट रद्द करा असे आवाहन, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी केल आहे
सावंतवाडी शहरातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना त्यांच्या हक्काच्या पगारासाठी गेले काही महिने वारंवार काम बंद आंदोलन करावे लागत आहे. यापूर्वी देखील हे कर्मचारी आपल्या हक्काच्या पगारासाठी संपावर गेले होते. शहर स्वच्छ ठेवून आपल घर संसार चालवणाऱ्या या सफाई कामगारांना ठेकेदार व प्रशासन वेगवेगळ्या सबबी सांगून वेठीस धरत असल्याचं चित्र या पूर्वी दिसून आलेलं होत. नवीन ठेकेदार निवडताना ज्या अटी व शर्ती लिहून घेतल्या जातात त्या अटींच पालन हे ठेकेदार करत नसल्याचे या पूर्वी अनेक वेळा दिसून आलेले आहे. या कर्मचाऱ्यांच्या हक्काची असलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा न करता त्यामध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. या बाबत चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिले होते मात्र त्यावर पुढे कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नव्याने आलेला ठेकेदार देखील या सफाई कर्मचाऱ्यांना पगाराच्या बाबतीत गुंडाळून ठेवत असल्याचं चित्र नव्याने दिसून येत आहे.
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कंत्राटी कामगारांना कोण जाणीवपूर्वक वेठीस धरत असेल व त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पगारासाठी वारंवार संपावर जावं लागत असेल तर या प्रश्नावर तात्पुरता तोडगा न काढता हा सफाईचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी व वेळ पडल्यास हा ठेका कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.










