
वैभववाडी : शासनाला खोटी माहिती देऊन नावळे गावातील स्नेहा शेळके पोलीस पाटील पदी नियुक्ती झाली आहे.त्या नावळे गावच्या ग्रामपंचायत सदस्या असतानाही प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आहे.त्यांची नियमबाह्यरित्या नियुक्ती झाली आहे. ती नियुक्ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी गावातील शिवाजी राजाराम गुरखे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.
नावळे गावच्या पोलीस पाटील पदी स्नेहा सुरेश शेळके यांची नियुक्ती झाली आहे.या निवडीला आता श्री.गुरखे यांनी आक्षेप घेतला आहे.पोलीस पाटील पद निवडीसंदर्भातील जाहीरातीत आणि अटी व शर्थीमध्ये ग्रामपंचायत सदस्य किवा राजकीय पक्षाच्या पदावर असलेल्या कुणीलाही पोलीस पाटील पदाकरीता अर्ज करता येत नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र प्रत्येक उमेद्वाराकडुन घेण्यात आले आहे.नावळे पोलीस पाटील स्नेहा शेळके यांनी देखील आपण ग्रामपंचायत सदस्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे.मात्र प्रत्यक्षात २३ डिसेंबर २०२२ ते ९ सप्टेंबर २०२४ पर्यत नावळे ग्रामपंचायत सदस्यपदी असल्याचे ग्रामपंचायतीकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच त्या ऑगस्ट २०२४ पर्यतच्या मासीक सभांना देखील त्या उपस्थित राहील्या आहेत.त्यामुळे त्यांनी पोलीस पाटील पदाकरीता अर्ज भरताना सत्य माहीती लपविली आहे.ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांची पोलीस पाटील पदी नियुक्त करण्यात आली आहे.ही नियुक्त चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेली असुन ती रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवाजी गुरखे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.