
राजापूर : सांगलीहून राजापूरकडे येणाऱ्या येथील आगाराच्या एस्टी बसला सोमवारी अणुस्कूरा घाटात सकाळी साडेदहाच्या दरम्यान अपघात घडला. ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. एसटी चालक एस.आर. कुर्णे यांनी प्रसंगावधान राखून बस दरीच्या विरुध्द दिशेला असलेल्या डोंगराच्या दिशेने घातल्याने मोठा अपघात टळला. त्यांच्या खबरदारीमुळे बसमधील ५० प्रवाशांचा जीव वाचल्याने त्यांचे कौतुक झाले आहे.
राजापूर आगाराची क्र.एम.एच १४ बीटी २९७५ ही बस सांगलीहून सकाळी सुटली आणि ती राजापूरला येत होती. सकाळीसाडेदहाच्या दरम्यान ती अणुस्कूरा घाटात आली असता अचानक गाडीचा ब्रेक निकामी झाला. ही बाब चालकएस.आर. कुर्णे यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत बस बाजूला असलेल्या डोंगराच्या बाजूला वळविली. त्यानंर ती बस डोंगराला जावून धडकली आणि थांबली. जर चालक कुर्णे यांनी प्रसंगावधान दाखविले नसते तर ती बस सरळ खाली खोल दरीत कोसळून मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने मोठा बाका प्रसंग टळला. दरम्यान झालेल्या या अपघातात काही प्रवाशांना मुका मार लागला. मात्र सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती राजापूर आगाराच्या पाचल येथील नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आली.
या अपघातात एस्टी बसचे नुकसान झाले असून बसची दर्शनी काच तुटली आहे. अपघाताची माहिती समजताच रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे कर्मचारी, तसेच पाचल येथील वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. राजापूर आगाराच्यावतीने लांब अंतराच्या प्रवासासाठी देण्यात येत असलेल्या बसेसच्या देखभाल दुरुस्तीबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकवेळा अत्यंत खराब आणि नादुरूस्त बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दिल्या जातात, अशी प्रवाशांची तक्रार असून राजापूर आगाराने यापुढे प्रवाशांचे हित नजरेपुढे ठेवून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी चांगल्या व सुस्थितीतील बसेस द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.