
कणकवली : कणकवली शहरातील कनकनगर येथील सौ. समृद्धी कोरगांवकर यांचे जेमतेम रात्रभरासाठी बंद असलेले घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी पणजी येथून अटक करण्यात आलेला चोरटा संतोष वसंत सुतार (४७. आंबवपोंक्षे सुतारवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याला मंगळवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेली ही घरफोडी रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. चोरट्याने कोरगांवकर यांचे घर फोडून साडेतीन लाखांचे दागिने व मोबाईलसह अन्य मुद्देमाल चोरला होता. याच मोबाईल लोकेशनच्या आधारे चोरट्यास एलसीबी व कणकवली पोलिसांच्या पथकाने सोमवारी पणजी येथून अटक केली होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करीत आहेत.