शिरोडा वेळागरवाडीत घरफोडी

दागिने आणि रक्कमेसह सुमारे ५ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस
Edited by: दिपेश परब
Published on: July 05, 2025 11:26 AM
views 150  views

अज्ञात चोरट्या विरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वेंगुर्ले :  तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील सुरभी सुरेंद्र कलंगुटकर यांच्या राहत्या घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचे लाँकर तोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे ५ लाख ७१ हजार ५००  रुपयांचा मुद्देमान अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेंगुर्ले पोलीस ठाण्यात सुरभी सुरेंद्र कलंगुटकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण ३ जुलै रोजी रत्नागिरी येथे कामानिमित्त गेला होत्या. ४ जुलै रोजी घरी आल्यावर आपल्या घराचा दरवाजा तोडलेल्या स्थितीमध्ये दिसून आला. मी घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाट फोडून चोरट्याने चोरी केल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी कपाटा मधील १ लाख ५४ हजार रुपये किमतीच्या ४ सोन्याच्या धातूच्या गोलाकार बांगड्या, ७० हजार रुपये किमतीच्या २ सोन्याच्या धातूच्या पाटल्या, १ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीच्या २ सोन्याच्या धातूच्या चैन, ७५ हजार रुपये किंमतीच्या ४ सोन्याच्या धातूचे कानातले जोड, ७५ हजार रुपये किमतीचे २ सोन्याच्या धातूचे गळ्यातील हार, २१ हजार रुपये किमतीचे २ सोन्याचे धातूचे कानातील पट्टे, ४९ हजार रुपये किमतीचे १ सोन्याचे धातूचे काळे मणी असलेले मंगळसूत्र, ५ हजार रुपये रोख रक्कम असा मिळून ५ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

दरम्यान त्यांच्या तक्रारीनुसार वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०५,३३१(३)३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दाभोलकर करीत आहेत .