
मंडणगड : सडे मानेवाडी येथे ३ अज्ञातांनी घरफोडी करुन रोख रक्कम व सोन्याचा ऐवज अशी २ लाख ९१ हजारांची चोरी केल्याची तक्रार मंडणगड पोलीस स्थानकांत नोंद झाली आहे. या घटनेसंदर्भात फिर्यादी नंदकिशोर परशुराम माने वय (६५) राहणार सडे मानेवाडी यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली.
फिर्यादी यांना ते झोपलेले असताना खिडकी सरकवण्याच आवाज आला ते बेडवरुन उठण्याचा प्रयत्न करत असताना तोंडावर रुमाल बांधलेल्या तीन अज्ञात इसमांनी फिर्यादी यांना पकडून फिर्यादीचे हात व पाय टॉवलेच्या मदतीने बांधले फिर्यादी यांचे मानेवर घरातील कोयती ठेवून जर तू ओरडण्याचा प्रयत्न केलास तर तुला जीवे ठार मारु अशी धमकी दिली.
तीन इसमांनी फिर्यादी याचे तोंडावर चादर टाकून फिर्यादी यांचे बेडरुम मधील कपाटमध्ये ठेवलेली रोख रक्कम व उषाखाली ठेवलेली सुमारे चार तोळे सोन्याची चेन जबरी चोरी करुन घेऊन गेले. या चोरीत फिर्यादी यांचे घरातील रोख रुपये ५५ हजार रुपयांची रोख रक्कम व २ लाख ३६ हजार रुपये किमंतीची ४ तोळ्याची चैन हा मुद्देमाल चोरीस गेला. त्यामुळे मंडणगड पोलीस स्थानकात चोरी करणाऱ्या तीन अज्ञातांचे विरोधात गु. र. न. 11/2025 भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 3039(4). 305, 331(4)351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे.