वैभववाडी : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात बीएसएनएल कंपनीची मोबाईल नेटवर्क सेवा विस्कळित झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भाग सध्या नॉट रिचेबल आहे. मोबाईल धारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. यामध्ये नेर्ले, उंबर्डे, आचिर्णे,खांबाळे व सांगुळवाडी भागात असलेल्या मनो-यावरील सेवा विस्कळित झाली आहे. काही मनो-यांवर माहिती व वीजपुरवठा करणाऱ्या वाहीन्या तुटल्याने तेथील सेवा बंद आहे.
तसेच, या मनो-यांना बॅटरी बॅकअप सुविधा नसल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर या मनो-यावरील नेटवर्क सेवा ठप्प होते. संबधित विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामीण भागातील मोबाईल धारक हैराण झाले आहेत.