
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी आग्रही भूमिका घेतल्यानंतर बीएसएनएलची यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही बीएसएनएल नेटवर्क सेवा तातडीने सुरळीत करण्यात येत असून चार महिन्यांत मे-जून पर्यंत ४ जी सेवेत अपग्रेडेशन पूर्ण करण्यात येणार आहे. शिवाय सिंधुदुर्गात हायस्पीड इंटरनेट सेवाही अधिक सक्षम करण्याबाबतच्या सूचना दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्या आहेत.
खासदार नारायण राणे यांना या सेवेबाबतची माहिती मंत्र्यांनी नुकतीच विशेष पत्राद्वारे दिली आहे. यात नमूद केले आहे की, सिंधुदुर्गातील बीएसएनएलच्या ४ जी सॅच्युरेशन प्रकल्पांतर्गत १८७ साइट्स (१५५ नवीन साइट्स आणि ३२ विद्यमान २जी/३ जी साइट) नियोजित आहेत. त्यापैकी २५ टॉवर्स कार्यान्वित झाले आहेत.
आता ४ जी अपग्रेडेशनसाठी ३२३ साइट्स (३८ नवीन ४ जी साइट्स आणि २८५ विद्यमान साइट्स) नियोजित आहेत. पैकी ४ साइट्स कार्यान्वित झाल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत उर्वरित ठिकाणी जून २०२५ पर्यंत कार्यान्वित होणार आहेत. इंटरनेट सेवाही गतिमान करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.