कर्कश्श जनरेटर बसविण्यास शिवसेनेचा विरोध

दुरसंचारच्या अधिकार्‍यांची घेतली भेट
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 18, 2023 15:39 PM
views 145  views

सावंतवाडी : बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरात असलेला आवाज होणारा जनरेटर बसविण्यास  शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी विरोध केला. त्याठिकाणी असलेला आवाज विरहीत जनरेटर रत्नागिरी येथे हलविण्यात येत असून कर्कश आवाज होणारा जनरेटर बसविण्याचा प्रयत्न असल्याचे पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर त्यांनी जनरेटर बदलू नये अशा सुचना दुरसंचारचे जिल्हा प्रंबंधक आर व्ही जून्नू यांना दिल्या. त्यानुसार त्यांनी आपण तो जनरेटर बसविणार नाही अशी भूमिका घेतली. शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी आज याबाबत आक्रमक भूमिका घेवून आवाज असलेला जनरेटर बसविण्यास विरोध केला.

शहरातील सालईवाडा येथे असलेल्या बीएसएनएल कार्यालयाच्या ठिकाणी प्रचंड आवाज करणारा जुना जनरेटर होता. या जनरेटरमधून येणारा धूर आणि आवाजामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी हा जनरेटर बदला अशी मागणी स्थानिक नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांच्यासह अनारोजीन लोबो यांनी बीएसएनएलकडे लावून धरली होती. प्रसंगी आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यांती हा जनरेटर बदलून त्या ठिकाणी नव्याने आवाज विरहित जनरेटर देण्यात आला होता. परंतु नव्याने देण्यात आलेला जनरेटर रत्नागिरी कार्यालयाला हलवण्याचा घाट घालण्यात आला आहे असे शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच आज बीएसएनएल कार्यालयात धडक देत श्री जन्नू यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये जनरेटर हलविल्यास आम्ही तीव्र विरोध करणार असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेचे शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, सपना नाटेकर, परशुराम चलवाडी, निलिमा चलवाडी,विशाल बांदेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान श्री.जन्नू यांनी सावंतवाडी कार्यालयाला 60 केबी क्षमतेचा जनरेटर आवश्यक आहे. सद्यस्थितीत असलेला जनरेटर हा 160 केबी क्षमतेचा आहे. त्यामुळे या जनरेटरची आवश्यकता रत्नागिरी येथील कार्यालयाला असल्याने तो त्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे. येथे नव्याने 60 केबी आणि तोही आवाज विरहित जनरेटर देण्यात येणार आहे. त्यामुळे आवाजाचा या ठिकाणी कुठलाही त्रास स्थानिक जनतेला होणार नाही असे स्पष्ट केले. मात्र, आवाज येणारा जनरेटर येथे आल्यास आम्ही गप्प बसणार नाही असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.