BREAKING | गोट्या सावंतांचा भिरवंडेत सतीश सावंतांना मोठा धक्का

भिरवंडे सरपंच सुजाता सावंत अपात्र | कोकण विभागीय आयुक्तांची कारवाई
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 26, 2022 14:50 PM
views 242  views

कणकवली : ग्रामपंचायतीच्या कामात अनियमितता आणि हलगर्जीपणा करत कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कणकवली तालुक्यातील भिरवंडे ग्रामपंचायतच्या सरपंच सुजाता संतोष सावंत यांना कोकण विभागीय आयुक्त यांनी अपात्र ठरवले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी याबाबतची तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार ही कारवाई केल्याने भिरवंडे सरपंचांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

याबाबत माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत केलेल्या तक्रारीनुसार, भिरवंडे चव्हाटा ते नाटळकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची नोंद नमुना नंबर २३ ला नसतानाही सरपंच सुजाता सावंत यांनी सही-शिक्यानिशी या उताऱ्याची प्रत दिली होती. त्यामुळे शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप सावंत यांनी केला होता. तसेच तेथील पायवाटेच्या नोंदीही नमुना नंबर २३ ला नसताना काम पूर्ण करून त्यावर खर्च करत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप सावंत यांनी केला होता. त्यानुसार, सरपंच यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी सावंत यांनी केली होती. मात्र, या आरोपावर सुनावणी दरम्यान खुलासा करताना सरपंच सुजाता सावंत यांनी सदरचा रस्ता हा त्यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी केला होता. परंतु, जमीनमालकाने संमती पत्र उशिरा दिल्याने २३ नंबरला नोंद उशिरा करण्यात आली. सुजाता सावंत यांची सरपंच म्हणून निवड ही ११ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली. सरपंच म्हणून कार्यभार माझ्याकडे नवीन होता, असा युक्तिवाद सरपंच सावंत यांनी केला होता.

तसेच सरकारी कामाबाबत अनुभव नसल्याने किंवा याबाबतची माहिती किंवा प्रशिक्षण घेतलेले नसल्याने चुकीने प्रस्तावावर सही झाल्याचे सावंत यांनी या चौकशी दरम्यान स्पष्ट केले होते. परंतु, सदर खडीकरण-डांबरीकरणाचे काम नामंजूर करण्यात आले होते. तसेच या प्रकरणी कोणताही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचा दावा सरपंच सावंत यांनी या चौकशीदरम्यान केला होता. या प्रकरणी ग्रामसेवक राकेश गोवळकर यांचीही बाजू सुनावणीदरम्यान जाणून घेण्यात आली होती. यावेळी त्यांनी संमतीपत्र सध्या उपलब्ध असल्याचे चौकशी दरम्यान स्पष्ट केले. मात्र, काही कारणाने त्यावेळी नोंद करण्याचे राहिल्याचेही सुनावणी दरम्यान स्पष्ट केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी या चौकशी दरम्यान आपला अभिप्राय देत असताना २३ नंबरला नोंद नसताना त्याचा उतारा दिला गेल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे अहवालात नमूद केले. त्यामुळे सरपंच सुजाता सावंत यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच सदर अनियमितेस सरपंच व ग्रामसेवक हे जबाबदार असल्याचे दिसून येत असल्याचा अभिप्रायही दिलेला आहे. ग्रामपंचायत रेकॉर्डची खात्री न करताच सरपंच व ग्रामसेवक यांनी विकास कामाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी करता सादर केले. ही बाब हलगर्जीपणा व अनियमितता असल्याचा अभिप्राय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. या कृतीची चूकही त्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे सरपंच ग्रामपंचायत भिरवंडे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा अभिप्राय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अहवाल व अभिप्राय ग्राह्य धरत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 (1) अन्वये सुजाता संतोष सावंत यांना अपात्र ठरवत पदावरून दूर केले आहे. सरपंच सुजाता सावंत यांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे भिरवंडे हे गाव असून सरपंच सुजाता सावंत या त्यांच्याच शिवसेना पक्षाच्या सरपंच असताना हा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांना देखील एक मोठा धक्का मानला जात आहे.