
सावंतवाडी : तब्बल 210 हून अधिक सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तरुण - तरुणींना अचानक ब्रेक देऊन त्यांचा तीन महिन्यांचा पगार रोखणाऱ्या संबंधित कंपनीकडून आमचा पगार आणि भविष्य निर्वाह निधी मिळवून द्या अशी मागणी आज संबंधित कर्मचाऱ्यांनी ठाकरे शिवसेनेचे विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याकडे केली.कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी प्रत्यक्ष चर्चा केली. तात्काळ पगार भविष्य निर्वाह निधी जमा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार 25 तारखेपर्यंत कंपनी ही रक्कम वळती करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असा विश्वास कंपनीचे अधिकारी विनायक जाधव व संदीप नाटलेकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथे सुरू असलेल्या एका बीपीओ सेंटरच्या माध्यमातून तब्बल 210 तरुण-तरुणींना अचानक ब्रेक देण्यात आला आहे. तसेच काही लोकांना काही कल्पना न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यांचे पगार तटविण्यात आले असून याबाबत आज संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे विधानसभाप्रमुख राऊळ यांची भेट घेतली. आपल्याला तात्काळ न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. यावेळी तालुका संघटक मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, राजू शेटकर आबा सावंत, प्रशांत बुगडे, सूजाता धडाम, विष्णू बांदेकर, भरत पगारे, अभिषेक राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.