डेरवण रुग्णालयात ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रियात यश

Edited by:
Published on: March 25, 2025 17:09 PM
views 240  views

रत्नागिरी : ३२ वर्षीय अमर मोहिते (नाव बदलले),  पुण्यात शेफ म्हणून काम करत होता. गेले काही महिने त्याला डोके दुखिने  ग्रासले होते. किरकोळ औषध घेऊन जरा डोके दुखी कमी झाली की  पुन्हा ते कामावर जात असे. पण हळूहळू त्याच्या मित्रांना तो  बोलताना अडखळतं असल्याचे निदर्शनास आले. तरीही सुट्टी न मिळाल्यामुळे काही दिवस अमरने  अंगावर काढत काम करीत राहिला. पण एक दिवस मात्र असह्य डोके दुखी सुरु झाली आणि जीभ जड झाली. मग मात्र त्याने धावपळ करत सी.टी. स्कॅनची अपॉइंटमेंट घेतली आणि दुर्दैव म्हणजे मेंदूत गाठ असल्याचे निदर्शनास आले, अमर आणि कुटुंबीय भयभीत झाले,  कारण तो एकमेव कुटुंबचा आधार होता. आता मेंदूवर शस्त्रक्रिया म्हणजे प्रचंड आर्थिक भार तो कसा उचलायचा या विविंचनेत असताना त्यांना एका मित्राने कोकणातील वालावलकर रुग्णालयाचे नाव सांगितले आणि आत्मविश्वासाने तिथे जा तुझे सर्व उपचार विनामूल्य होतील अशी माहिती दिली. अमर ताबडतोब डेरवणला आला.  

डॉ मृदुल भटजीवाले यांनी अमरच्या मेंदूतील गाठीवर  ताबडतोब  शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. वालावलकर रुग्णालयातील सुसज्ज अशा अत्याधुनिक ऑपेरेशन थिएटरमध्ये  मेंदूवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक अशा मायक्रोस्कोपखाली डॉ मृदुल यांनी शस्त्रक्रिया पार पाडली . ही अत्यंत क्लिष्ट अशी मेंदूची शस्त्रक्रिया ५  तास चालली त्यात जवळ जवळ ५ x  ५ सेंटीमीटरचा ट्युमर अमरच्या  डाव्या मेंदूत  महत्वाच्या भागात म्हणजे जिथे आपली वाचा आणि हातापायातील शक्तीचे केंद्र असते तिथेच ठाण मांडून बसली होती आणि हळुवारपणे ही  गाठ मेंदूच्या पाण्यातील प्रवाहावरही दाब देत होती. त्यामुळे हि शस्त्रक्रिया अमरच्या पुढील भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची ठरली.  पण आश्चर्य म्हणजे शस्त्रक्रियेनंतर भूल उतरताच हळूहळू अमर जागा होऊ लागला आणि काही दिवसातच  अंथरुणावर उठून बसला आणि सामान्यपणे बोलायला लागला. त्या वेळी कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.  चार दिवसांत डिस्चार्ज हि देण्यात आला. हे सर्व उपचार महात्मा  फुले जन  आरोग्य योजने अंतर्गत मोफत झाल्यामुळे अमरच्या कुटुंबीयांनी वालावलकर रुग्णालय आणि न्यूरो सर्जन मृदुल भटजीवाले,  त्यांच्या सहाय्यक डॉ. अनुष्का सिंग,  डॉ. लीना ठाकूर आणि डॉ. गौरव (भूलतज्ज्ञ), डॉ. शिवानी आणि डॉ. सलोनी यांचे आभार मानले. 

भ .क. ल.  वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथे ब्रेन ट्यूमरच्या गुंतागुंतीच्या अशा शस्त्रक्रिया नियमितपणे केल्या जातात .  महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत बहुतांश शस्त्रक्रिया मोफत होत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. आजपर्यंत  अशा शेकडो रुग्णांना दिलासा मिळाला आहे ज्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करून अशा मेंदूच्या शस्त्रक्रियांसाठी मुंबई किंवा पुण्याला लांब जावे लागत होते ते आता  वालावलकर रूग्णालयात सहज शक्य झाले आहे.