
सावंतवाडी : कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित, कलंबिस्त यांच्यातर्फे नुकतेच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या दूध केंद्रामध्ये पाडवा-दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संस्थेचे चेअरमन ॲड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सुमारे २० हून अधिक शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात आले. तसेच, दिवाळीनिमित्त त्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या.
यावेळी बोलताना चेअरमन ॲड. संतोष सावंत यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोकुळ दूध संघामार्फत शेतकऱ्यांना बोनस देण्यात येत असून तो थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
ॲड. सावंत यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. विशेषतः, गोकुळ आणि जिल्हा बँक यांच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी दुधाळ गाई-म्हशींसाठी कर्ज योजना उपलब्ध आहेत, त्याचा लाभ येथील शेतकऱ्यांनी घ्यावा. यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांसाठी खास कर्ज योजना व बँक योजनेची माहिती, तसेच दुधाळ गाई-म्हशींच्या योजनांबाबत माहिती देण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
यासोबतच, शेतकऱ्यांच्या जनावरांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रमही संस्थेतर्फे लवकरच राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला संस्थेचे सचिव रमेश सावंत, संचालक लक्ष्मण राऊळ, दत्ताराम कदम, राजन घाडी, सिप्रायान रोड्रिक्स, स्वप्निल सावंत, संजय माडगूत, दाजी कुडतरकर, राजन सावंत, सिद्धेश सावंत, श्री. पवार, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ आबा सावंत, प्रकाश सावंत, श्री. सावंत आणि आनंद बिडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव रमेश सावंत यांनी मानले.