
सावंतवाडी : केसरी येथे शरद नारकर यांच्या फार्मवर निळ्या रंगाचा खेकडा दिसून आला. हा खेकडा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. इतर खेकड्यांपेक्षा रंग वेगळा असल्याने याचे कुतूहल अधिक आहे. आंबोली घाटात या आधी खेकड्याच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लागला होता. विविध प्रजातींचे खेकडे तिथे आढळून आलेत. निसर्ग अभ्यासक, वन्यजीव प्रेमी तेजस ठाकरे यांनी एका खेकड्याच्या दुर्मिळ प्रजातीला शोध इथे घेतला होता. गडद भगव्या रंगाच्या खेकड्याचं नाव गुबरनॅतोरिएना ठॅकरी असं ठेवण्यात आल होत. त्यात आता आंबोलीच्या पायथ्याशी केसरी येथे शरद नारकर यांच्या फार्मवर निळ्या रंगाचा खेकडा दिसून आला आहे. आतापर्यंत खेकड्यांच्या शंभर प्रजातींची नोंद झालीय. अभ्यासानंतर या प्रजाती दुर्मिळ असल्याचे शिक्कामोर्तब झालंय. त्यांच्या गुणधर्म आणि वर्णानुसार खेकड्यांची लॅटिन भाषेत नावं ठेवण्यात आलीत. गॅटिएना एत्रोपरपरिआ, गॅटिएना स्पेलिंडिडा, गुबरनॅतोरिएना एल्कोकी, गुबरनॅतोरिएना वॅगी अशी नावे त्यांना देण्यात आली आहेत. त्यामुळे आता या निळ्या खेकड्याच्या प्रजातीबाबत संशोधक कोणती माहीती देतात याविषयी कुतुहल निर्माण झाले आहे.