असनियेतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 19, 2024 08:14 AM
views 66  views

सावंतवाडी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त असनिये येथील शिवतेज मंडळ आणि असनिये ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. असनिये सारख्या दुर्गम गावात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात उल्लेखनीय म्हणजे युवतींसह महिलांचाही समावेश होता.

असनिये प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन असनिये सरपंचा सरपंच रेश्मा सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पडवे येथील एस एस पी एम हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे डॉ मनिष यादव, उपसरपंच साक्षी सावंत सामाजिक कार्यकर्ते प्रितेश ठिकार, तांबोळी उपसरपंच जगदिश सावंत, शिवतेज मंडळाचे अध्यक्ष दिनेश सावंत, उपाध्यक्ष सचिन कोलते सचिव प्रशांत ठिकार आदी मान्यवर उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठान हिन्दुस्थान सिंधुदुर्ग विभागाच्या रणरागिणी प्रशासक सिया गावकर यानीही  या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. शिवतेज मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे असनिये यासारख्या दुर्गम गावात या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. याबद्दल एस एस पी एम हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे डॉ मनिष यादव यानी शिवतेज मंडळाचे कौतुक केले.

या शिबिरात रक्त संकलन करण्यासाठी पडवे येथील एस एस पी एम रक्तपेढीचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. याबद्दल त्यांचे शिवतेज मंडळाच्यावतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रास्ताविक प्रितेश ठिकार तर आभार दर्शन सावंत यानी मानले.