
वेंगुर्ला : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात " सेवा पंधरवडा " व “विकास दिवस” विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवा उपक्रमांनी साजरा केला जात आहे. पंतप्रधानांचा वाढदिवस दरवर्षी भाजपा तर्फे “सेवा पंधरवडा” म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, रक्तदान, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबवले जातात.
याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय येथे १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वा. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरासाठी विविध नामांकित संस्था, संघटना व शासकीय विभागांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये भाजपा सिंधुदुर्ग, युवा मोर्चा , युवक आणि खेळ मंत्रालय, भारत सरकारचे “मेरा युवा भारत – सिंधुदुर्ग”, रक्तदान क्षेत्रातील अग्रणी संस्था वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस,एन.सी.सी. आणि एन.एस.एस. विभाग_ बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान , वेंगुर्ला या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात येत असून, महाविद्यालय प्रशासन व स्थानिक नागरिक यांना यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान हीच खरी मानवसेवा आहे, असे मानले जाते. एका रक्तदात्याच्या एका पिशवी रक्तामुळे तीन ते चार जणांचे जीव वाचू शकतात. आपत्कालीन परिस्थितीत, अपघात, शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांमध्ये रक्ताची आवश्यकता भासते. परंतु, रक्तसाठ्याची उपलब्धता अनेकदा अपुरी पडते. या पार्श्वभूमीवर युवक-युवतींनी मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.
या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रक्तदात्यांनी वेताळ प्रतिष्ठान चे सचिव डॉ. सचिन परुळकर ( मो. ९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा.
आयोजक संस्थांच्या वतीने सेवा पंधरवडा चे जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई आणि मेरा युवा भारत सिंधुदुर्गचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी सांगितले की, “रक्तदान ही सेवा केवळ समाजापुरती मर्यादित नसून ती राष्ट्रसेवेसमान आहे. या शिबिरात तरुणांनी उत्साहाने सहभागी व्हावे आणि पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘विकास दिवस’ रक्तदान करून खऱ्या अर्थाने साजरा करावा.” असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर यांनी केले .