शिवसेनेच्या दत्ता सामंतांना भाजपच्या बाबा मोंडकरांचा इशारा

मालवणात युतीत कुस्ती ?
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 26, 2025 20:21 PM
views 80  views

मालवण : भाजप कार्यकारिणीत पदावर कार्यरत कार्यकर्त्यांना आमिष दाखवित मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश करून घेतले जात आहेत. अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे प्रकार सुरू असून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. त्यांनी हे प्रकार आजपासूनच बंद करावेत अन्यथा भाजप त्यांना जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. 

दरम्यान याबाबतची तक्रार आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली असून त्यांनी याची गंभीर दखल घेतली असल्याचेही श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले. 

शहरातील फोवकांडा पिंपळ येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी सुदेश आचरेकर, मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर, पंकज सादये, विजय केनवडेकर, महिला पदाधिकारी अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, सेजल परब, राणी पराडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. मोंडकर म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणूक ही भाजप व मित्रपक्षाने महायुतीच्या माध्यमातून लढविली. त्यातून देशात, राज्यात चांगले यशही मिळाले. यात नारायण राणे हे खासदार, नितेश राणे आमदार म्हणून तर महायुतीचे आमदार म्हणून निलेश राणे निवडून आले. गेल्या वर्षभरात महायुतीच्या माध्यमातून जो बॅकलॉग होता तो भरण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पण यात गेल्या काही दिवसांत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ठाकरे शिवसेनेचे लोक आहेत. त्यांना वेगवेगळी प्रलोभने, आश्वासने देत दोन्ही पक्ष एकच आहेत असे सांगून भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश घेत त्यांना नियुक्ती देण्याचा सपाटा लावला आहे. महायुतीच्या समन्वयासाठी ही चुकीची बाब आहे. 

दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जे काही प्रकार सुरू केले आहेत. हे प्रकार थांबणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सर्व माहिती पोचविण्यात येईल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनता कुठेतरी भाजपच्या बाजूने असल्याचे दिसताच त्यांनी नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेणे चुकीचे आहे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून किनारपट्टी भागात चांगली कामे सुरू असताना त्याच्याबाबत गैरसमज पसरविण्याचे काम श्री. सामंत करत आहेत. त्यामुळे महायुती कलुषित करण्याचे काम ते करत असून भविष्यात याला ते जबाबदार राहणार आहेत असे श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले. 

मित्रपक्षातील हा विषय समन्वयातून मिटावा अशी आमची अपेक्षा होती. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यांनी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना घ्यावे. मित्रपक्षातील कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही आणि जर असे होत असेल तर भाजपचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही. जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजप सक्षम आहे. सामंत यांनी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शहाराध्यक्ष या तिन्ही पदांची कामे करत आपण वेगळे काहीतरी करत आहोत हे दाखवू नये. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांचा अपमान करणे या गोष्टी दत्ता सामंत यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सोडून द्याव्यात. महायुती म्हणून चांगले काम सुरू असताना जिल्हाध्यक्ष सामंत यांच्याकडून संकुचित वृत्तीचे काम सुरू आहे. आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघटनेतील संघटक म्हणून काम करावे. अशा प्रकारचा त्रास मित्रपक्षाला देऊ नये हीच सामंत यांच्याकडून अपेक्षा असल्याचेही श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले.