
सिंधुदुर्गनगरी : नागरिकांना मदत करणारा सेवा पंधरावडा राज्यभर साजरा झाला. केवळ अभियानापुरते कार्यक्रम न होता त्याचा उपयोग जनतेसाठी व्हावा असे विविध कार्यक्रम भाजपाने केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या निमित्ताने या अभियान काळात सिंधुदुर्ग राज्यात अव्वल ठरेल एवढे काम भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केले आहे.स्वदेशी सह, स्वच्छता, रक्तदान, वृक्षारोपण, रुग्णसेवा, विविध स्पर्धा महिला मिळावे प्रदर्शने अशा विविध उपक्रमामुळे हे अभियान सर्वांना प्रेरणादायी ठरल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या अभियान काळाची माहिती प्रभाकर सावंत यांनी दिली. यावेळी या अभियानाचे संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, महिला नेत्या संध्या तेरसे यावेळी उपस्थित होत्या. या अभियान काळात स्वच्छता अभियानाचे १२२ कार्यक्रम घेण्यात आले. विशेषतः किनारपट्टी स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, मंडळे, स्वच्छता दूत नागरिक अशा ३४०० जणांचा सहभाग या स्वच्छतेमध्ये झाला. वृक्षारोपण व त्या वृक्षाचे संवर्धन याबाबत जिल्ह्यात ५० कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक हजार लोकांचा सहभाग मिळाला. या पंधरा दिवसाच्या काळात रक्तदान शिबिराचे आठ कार्यक्रम झाले व यामधून ६४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्ह्यात ३१ ठिकाणी आरोग्य शिबिरे झाली. व त्यात ४०७३ नागरिकांना रुग्णसेवा देण्यात आली. याच काळात बुद्धिजीवी संमेलन घेण्यात आले व त्यात अनेक विषयांवर विकासाच्या दृष्टीने चर्चा झाली. जिल्ह्यातील अपंग व्यक्तींसाठी घेण्यात आलेल्या कसाल व जाणवली येथील शिबिरामध्ये २०० दिव्यांगाना साहित्याचे वाटप करण्यात आले.
या दिव्यांगांचे अनेक प्रश्न, अपंग प्रमाणपत्र, अपंग योजना, घरकुल योजना याबाबतचे प्रश्न सोडविण्यात आले. महिला बचत गटांसाठी तीन ठिकाणी महिला उत्पादनांची प्रदर्शने भरविण्यात आली. वेंगुर्ला व सावंतवाडी येथे चित्रकला स्पर्धा झाले त्यात १४५० स्पर्धकांनी सहभाग घेतला, सावंतवाडी येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ३५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. तर रांगोळी स्पर्धेमध्ये ६५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. जिल्ह्यात झालेल्या महिला मेळाव्यामध्ये ३८०० महिलांचा सहभाग हे भाजपाने जिल्ह्यात राबविले सर्वच उपक्रम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी असे ठरले.










