
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सावरवाड ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. सरपंच पदाच्या उमेदवार देवयानी देवानंद पवार यांच्यासह ग्रामपंचायतचे सातही सदस्य बिनविरोध निवडून आले असून भाजपचे आंबोली मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्या माध्यमातून भाजपने येथे एकतर्फी विजय संपादित केला आहे.
केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे गावच्या विकासात योगदान देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सोबत राहण्याचा निर्णय सावंतवाडी तालुक्यातील सावरवाड गावच्या ग्रामस्थांनी घेतला. यासाठी भारतीय जनता पार्टीचे आंबोली मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी पुढाकार घेतला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचांसह भाजपचे सर्व सातही सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यासाठी रवींद्र मडगावकर यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी बिनविरोध सरपंच देवयानी पवार व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी रवींद्र मडगावकर यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा चिटणीस तथा माजी नगरसेवक मनोज नाईक, एकनाथ नाडकर्णी, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.