
सावंतवाडी : समिता पियुष सावंत हीनं सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा केला. साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्राच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथील मुलांसह तिने आपला जन्मदिवस साजरा केला.
या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकूण ६५ दिव्यांग विद्यार्थी - विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. समिता पियुष सावंत या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांच्या सुकन्या आहेत. वडिलांचे सामाजिक कार्य पाहून समिता यांनी सामाजिक कार्य करून आपला जन्मदिवस साजरा केला. तसेच यापुढील सर्वच वाढदिवस आपण दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहवासातच साजरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याच दिवशी एका दिव्यांग विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता. त्या विद्यार्थ्यांचाही वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वस्तू, खेळणी व काही वस्तू भेट दिल्या. संस्थेच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी १० स्कूल बेंचची मागणी केली असता संस्थेच्या कार्यकर्त्यां शरदिनी बागवे यांनी १० स्कूल बेंच लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे व त्यांची सेवा करणाऱ्या रूपाली पाटील,सखाराम नाईक, न्हानू देसाई, प्रवीण सूर्यवंशी, द्रोपती राहुल, विदिशा सावंत, पूनम गायकवाड, संजना सुभाटे ,पूजा डोल्हारे तसेच सार्वजनिक बांधकाम उप अभियंता सीमा गोवेकर ,सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, शरदिनी बागवे, रूपा मुद्राळे, रवी जाधव व पालक वर्ग उपस्थित होते.