कै.पु.रा.बेहेरेंच्या फोटो चरित्रांचे 29 ला प्रकाशन

Edited by: विनायक गांवस
Published on: October 30, 2024 06:34 AM
views 157  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील आजगाव गावचे सुपुत्र तथा नवशक्तीचे संपादक, लेखक, ज्येष्ठ साहित्यिक कै.पु.रा.बेहेरे यांची चालूवर्षी जन्मशताब्दी आहे. हा जन्मशताब्दी सोहळा साजरा करण्याचे आयोजन त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेय. २९ एप्रिल २०२५ रोजी त्यांचे मूळगाव आजगाव येथे कै.पु.रा.बेहेरेंच्या फोटो चरित्रांचे प्रकाशन केले जाणार असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र तथा इम्पोसेसचे माजी संचालक वासुदेव बेहेरे यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषद आयोजित ते बोलत होते.

श्री. बेहरे म्हणाले, माझे वडील कै.पु.रा.बेहेरे हे नवशक्तीचे ३० वर्ष संपादक होते‌. कोकणच वर्तमानपत्र म्हणून ते नवशक्ती चालवत होते. कोकणातून खूप मोठा प्रतिसाद दैनिकाला होता. आणीबाणीच्या काळात त्यांनी महत्त्वपूर्ण भुमिका बजावली होती. इंदीरा गांधी, बाळासाहेब ठाकरे आदींसह राजकीय, साहित्य क्षेत्रातील व्यक्तींचा सहवास होता. त्यावेळचे अनेक किस्से आहेत. जवळपास ३ हजार फोटो असून त्यातील निवडक छायाचित्रांचे फोटो चरित्र संपादित करत आहोत. आजकाल वाचनाची आवड मुलांमध्ये दिसत नाही. वाचनाला तेवढा वेळ दिला जात नाही. त्यामुळे हे फोटोचित्र संपादित केल‌ जात आहे. यामध्ये फोटोंसह कुमार केतकरांपासून अनेक दिग्गजांचे लेख देखील असणार आहेत. वडिलांनी जवळपास २२ पुस्तक लिहीली होती. शिवाजी महाराज हे आठवे प्रेक्षीत आहेत, कोकणातील देवदेस्की आदी पुस्तकांवर  पीएचडी देखील केली गेली आहे. विद्यापिठ स्तरावर त्यांच्या पुस्तकाचा विचार केला गेलाय. सिंधुदुर्गचे साहित्यिक जयवंत दळवी त्यांचे समवयस्क होते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर हे त्यांचे गुरू होते. हा त्यांचा प्रवास या फोटो चरित्रातून उलगडला जाणार आहे. 

त्यांच्या मुळगावी आजगाव येथे २९ एप्रिल २०२५ ला जन्मशताब्दी वर्षानिमित्त या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव आदी उपस्थित होते.