आताची मोठी बातमी | राजापूरच्या निवासी नायब तहसीलदारांवर बिबट्याचा हल्ला !

राजापूर वनविभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर घडला प्रकार
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 01, 2023 09:27 AM
views 793  views

राजापूर : कोकणात बिबट्याने उच्चपदस्थ महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या निवासी नायब तहसीलदार महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे. 


राजापूरच्या नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडित मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास राजापूर पंचायत समितीकडे जात होत्या. यावेळी शहरातील भट आळी येथील पोलिस लाइन्सच्या बाजूला बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत. ज्या ठिकाणी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, तिथपासून राजापूर वनविभागाचे कार्यालय केवळ हाकेच्या अंतरावर आहे.


खरं तर येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी या भागात बिबट्या फिरत असल्याची तक्रार केली होती, मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याने आज बिबट्याच्या हल्यात राजापूरच्या नायब तहसिलदारच जखमी झाल्या आहेत .


सौ. दीपाली पंडित या मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास राजापूर पंचायत समितीच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या. त्या राजापूर पोलिस लाइन पासून काही मीटर अंतरावर असणाऱ्या भारत बेकरीच्या भट्टीजवळ आल्या असता तेथील गडग्यावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.


बिबट्या हल्ला करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या हातावर बिबट्याने पंजा मारला असून दुचाकीवरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. परंतु सुदैवाने या हल्ल्यातून त्या बालंबाल बचावल्या आहेत.