
दोडामार्ग : तिलारी कालव्याच्या गळतीबाबत एक मोठी बातमी समोर येतेय. तिलारी प्रकल्पातील पेडणे तालुक्यात येणारा कालवा ठिकठिकाणी झिरपत असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. धारगळ-दाडाची वाडी परिसर, आयुष हॉस्पिटल परिसर, सुकेकुळण परिसर तोरसे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिळारी कालव्यांना भगदाडे पडली असून ठिकठिकाणी पाणी वाया जात आहे.
शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. चिऱ्यांच्या खाणी तुडुंब भरलेल्या आहेत, असे चित्र धारगळ परिसरात आणि सुकेकुळण भागात दिसून येत आहे. याकडे जलसिंचन खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारबरोबर करार करत असताना तिलारी येथे पाणी प्रकल्प उभारला आणि त्यावेळी ठरले होते की, 75 टक्के पाणी हे गोवा सरकारला आणि 30 टक्के पाणी महाराष्ट्र सरकारला आणि तशा प्रकारे 75 टक्के खर्च हा गोवा सरकारने केला होता.
प्रकल्पातून कालवे बांधत असताना ते पाणी महाराष्ट्रातून पेडणे तालुक्यात आणण्यासाठी पाटबंधारे अंतर्गत ठिकठिकाणी कालवे उभारले. परंतु हे कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे अनेक ठिकाणी कालव्यांना गळती लागलेली आहे. यातून पाणी वाया जात असल्यामुळे कधी-कधी पाणी टंचाईही निर्माण होते.
तोरसे-राजवेल येथील तिळारी कालव्यालाही ठिकठिकाणी गळती लागली आहे. या पाण्यामुळे याही परिसरातील घरांना धोका निर्माण झाल्याने वेळोवेळी पेडणे तालुका विकास समितीने आवाज उठवलेला आहे. शिवाय लेखी निवेदनेही सरकारला सादर केलेली आहेत. परंतु पेडणे तालुक्यात जे-जे कालवे ज्यांच्या बागायती शेतीच्या जवळून गेले आहेत, ते कालवे नादुरुस्त आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यास आजपर्यंत जलसिंचन विभागाला मुहूर्त का सापडत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.