BIG BREAKING | हेवाळे-बाबरवाडीत हत्तींच धुमशान सुरूच

तब्बल पाच तास शेतकरी हत्तींच्या दहशतीखाली
Edited by: संदीप देसाई
Published on: April 12, 2023 09:32 AM
views 93  views

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत वन्य हत्तींच्या उपद्रव  सुरूच आहे. हेवाळे बाबरवाडी येथील प्रगतशील शेतकरी अमृत देसाई यांच्या केळी व सुपारी बागायतीचे पुन्हा एकदा मोठे नुकसान या हत्तींनी केले आहे. सायंकाळी साडेसात वाजता बागायतीत घुसलेला पाच हत्तींचा कळप तब्बल चार तासांच्या शेतकरी व त्यानंतर दाखल झालेल्या हत्ती गस्त पथकाच्या अथक प्रयत्नानंतर मोठी नुकसानी करून बागायतीतून बाहेर पडला.

गेल्या दोन दिवसांपूर्वी शेतकरी अमृत देसाई यांच्या शेती बागायतीत याच हत्तींनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला होता. सोमवारी पुनः सायंकाळी 7.30 वाजता दाखल झालेल्या या हत्तींच्या हैदोसाचा प्रकार रात्रो 12.30 वा. पर्यन्त सुरूच होता. 

तिलारी खोऱ्यात मुक्तपणे संचार करणाऱ्या 5 हत्तींच्या कळपाचा व इका टस्कर हत्तींचा सर्वत्र धुडगूस सुरूच आहे. त्यापैकी एक हत्ती बाबरवाडी येथे दोन दिवसांपूर्वी दाखल होत त्याने तेथील शेतकरी अमृत सीताराम देसाई यांच्या शेती बागायतीत उच्छाद मांडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते.  यावेळी अमृत देसाई यांसह  शेतकरी समीर देसाई, कृष्णा देसाई, शिवाजी देसाई यांनी फटाके लावत, आरडाओरडा करत हत्तींना पिटाळवुन लावण्याचे अथक प्रयत्न केले.  मात्र त्याचा या हत्तीवर काहीही परीणाम झाला. त्यानंतर पत्रकार संदीप देसाई यांनी वनक्षेत्रपाल ए. आर. कन्नमवार व हत्ती गस्त पथकाशी संपर्क साधत याबाबतची माहिती त्यांना दिली. त्यांनतर तात्काळ श्री. कन्नमवार यांनी हत्तीगस्त पथक बाबरवाडी येथे पाठवत हत्तीना बागेतून पिटाळवुन लावले. मात्र श्री. देसाई यांच्या शेतीबागायतीचे या हत्तींनी अतोनात नुकसान केले. शिवाय हत्ती पुन्हा वस्तीत येतील या भीतीने ग्रामस्थ भयभीत आहेत. तरी वनविभागाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी बाबरवाडी ग्रामस्थ करत आहेत.