
बांदा : गोवा ते इंदौर दरम्यान होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात बांदा पोलीसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर मोठी कारवाई केली आहे. तब्बल १२ लाख ४७ हजार ६१६ रुपयांची दारु या कारवाईत पकडली आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला १० लाख रुपये किमतीचा आयशर कंटेनर (एमएच ०४ जीआर ७२३८) असा एकूण २२ लाख ४७ हजार ६१६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. दारु वाहतूक प्रकरणी जुल्फिकार ताजअली चौधरी (वय ५६, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रात्री १२.२० च्या सुमारास करण्यात आली.
या कारवाईत ७२२ पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की असे इंग्रजी लेबल असलेल्या १८० मिलीच्या गोवा बनावटीच्या एकूण ३४ हजार ६५६ प्लास्टिक बाटल्या पकडण्यात आल्या आहेत. सदर कारवाई बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, प्रथमेश पोवार व विजय जाधव यांच्या पथकाने केली. बऱ्याच महिन्यांच्या कालावधी नंतर चेकपोस्टवर दारु कारवाई करण्यात आली आहे.