बिडवलकर खून प्रकरणात अजून एकाला अटक

अन्य आरोपींना पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी
Edited by:
Published on: April 19, 2025 20:34 PM
views 28  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण आणि खून प्रकरणात आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासह याच गुन्ह्यातील गणेश नार्वेकर वगळता न्यायालयीन कोठडीत असलेल्या अन्य संशयितांना आज पुन्हा कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने या पाच संशयित आरोपीना २२ एप्रिल पर्यंत तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

  प्रकाश बिडवलकर खून प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असताना पोलीस मात्र या प्रकरणात आपले काम चोख बजावत आहेत. या प्रकरणी तपास करताना पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा या प्रकरणातील सहावा आरोपी गौरव वराडकर याला सातार्डा येथून ताब्यात घेतले. बिडवलकर यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर संशयित आरोपीना मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

     दरम्यान प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील सिद्धेश शिरसाट (रा.कुडाळ),अमोल शिरसाट,(रा. कुडाळ), सर्वेश केरकर (सातार्डा), गणेश नार्वेकर (माणगाव) व अनिकेत गावडे (रा.पिंगुळी) या पाचही जणांना पोलिस कोठडी व त्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडी अबाधित राखून न्यायालयीन कोठडी दिली होती. यातील गणेश नार्वेकर वगळून इतरांना आणि सहावा संशयित आरोपी गौरव वराडकर याला  शनिवारी कुडाळ न्यायालयात पोलिसांनी हजर केले.संशयित आरोपी गणेश नार्वेकर याच्यावर अजून वैद्यकीय उपचार सुरु आहेत, त्यामुळे तो अजून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले नाही.  

    यावेळी तपासी अधिकारी तथा डीवायएसपी श्री.कांबळे यांनी संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश शिरसाट व मृत प्रकाश बिडवलकर या दोघांचे मोबाईल हस्तगत करावयाचे आहेत, तसेच या प्रकरणात अन्य दोन गाड्या वापरण्यात आलेल्या आहेत, त्या दोन्ही गाड्या आम्हाला ताब्यात घ्यावयाच्या आहेत. त्यामुळे संशयित आरोपींना सात दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी,अशी मागणी न्यायालयाकडे केली. यावेळी न्यायालयाने संशयित पाचही आरोपींना दि.२२ एप्रिल पर्यंत म्हणजेच तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. आरोपीच्या वतीने ऍड. विवेक मांडकुलकर व ऍड .संजीव प्रभू यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने श्रीमती पाटील यांनी युक्तिवाद केला.अशी माहिती सह तपासणी अंमलदार तथा निवती पोलिस स्थानकचे पोलिस अधिकारी श्री.गायकवाड यांनी दिली.