जर्मन औद्योगिक शिष्टमंडळाची भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला भेट

नियोजित स्किल ट्रेनिंग सेंटरची केली पाहणी
Edited by: विनायक गांवस
Published on: April 23, 2024 10:39 AM
views 197  views

सावंतवाडी : औद्योगिक शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून जर्मनीच्या औद्योगिक शिष्टमंडळाने यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या सावंतवाडीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट दिली. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना जर्मनीच्या औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षण केंद्राची पाहणी करणे हा या शिष्टमंडळाच्या भेटीचा उद्देश होता.

यामध्ये जर्मनी येथील डॉ.नसिबे इसुफाज, रोलँड हास, पॉलिना जवॉर्स्का, अँड्रियास रीफस्टेक, बास्टियन मुलर, हॅराल्ड कुंझेनडॉर्फ, कविता राव, संतोष देशपांडे आणि ओंकार कलवडे या उद्योजकांचा समावेश होता. सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन कॉलेजचे संस्थापक अच्युत सावंत भोसले यांनी स्वागत केले.

या शिष्टमंडळातील सर्वच सदस्यानी जर्मनीतील औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढत असलेली कुशल तंत्रज्ञांची मागणी अधोरेखित केली. प्रगत उत्पादन पद्धती आणि तांत्रिक कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला जर्मनी, भारताकडे आपल्या कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करणारा एक प्रमुख स्रोत म्हणून पाहतो. भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील नियोजित प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्याना प्रगत उत्पादन तंत्र, ऑटोमेशन, अचूक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता यांसारख्या क्षेत्रांमध्ये निपुण बनविणार असल्याचा विश्वास यावेळी सदस्यांनी व्यक्त केला. तांत्रिक कौशल्यासोबतच हे केंद्र मुख्यत्वे जर्मन भाषा, सांस्कृतिक वातावरणाची ओळख व प्रभावी संवाद क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल असेही ते म्हणाले.

कॉलेजची संपूर्ण पहाणी केल्यानंतर या ठिकाणचे प्रशिक्षण केंद्र जागतिक दर्जाचे असेल असा विश्वास सर्व सदस्यानी व्यक्त केला. मे महिन्यात विद्यार्थ्यांच्या पहिल्या प्रशिक्षण तुकडीला प्रारंभ करण्यात येईल. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.