मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन

Edited by: देवयानी वरसकर
Published on: August 21, 2024 13:12 PM
views 188  views

रत्नागिरी :  उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानतळ अत्यंत महत्वाचे आहे. हेलिकॉप्टर सेवा, टुरिस्ट सर्कीट तयार केल्यास मोठा फायदा होणार आहे. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे हात तयार करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे कुदळ मारुन आणि कोनशिलेचे अनावरण करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपुजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, रविंद्र फाटक, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे,  जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, मिरजोळे सरपंच रत्नदिप पाटील, शिरगाव सरपंच फरिदा काझी आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचा श्रीगणेशा झाला, नवं दालन तयार झाल्याशिवाय राहणार नाही. जगाला टक्कर देणारे इथले पर्यटन आहे. त्यासाठी कनेक्टीव्हीटी खूप महत्वाची आहे. नाईट लँडीगची सुविधा केल्यास परदेशी पर्यटक वाढण्यास मदत होणार आहे. पूर्ण क्षमतेने विमानतळ चालले पाहिजे, असे करा. 10 हजार कोटींचे डिफेन्स सेक्टरमधील उद्योग इच्छुक आहेत. उद्योगासाठी पायाभूत सुविधा आणि वातावरण चांगले आहे. 

दावोसमध्ये 5 लाख कोटीचे सामंजस्य करार केले होते. त्यातील 70 टक्के अमंलबजावणी स्तरावर आहेत. उद्योग क्षेत्रात भरभराट होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनातूनही विकासाची मोठी संधी आहे. मासेमारीतून खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होत आहे. या सर्व विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी विमानतळ ही सर्वात मोठी सुविधा आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

    जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत, यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा सरकार देत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक नवे उद्योग येत आहेत. निसर्ग सौंदर्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणार आहे. मासेमारी हा रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग आहे. या सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी कनेक्टिव्हिटी हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. या इमारतीचे काम लवकरच पूर्ण होईल आणि  विमान वाहतूक सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले,  दोन महिन्यापूर्वी विमानतळाबाबत बैठक आयोजित केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी टर्मिनल इमारतीसाठी 100 कोटी देण्याचा निर्णय घेतला. गतिमान पध्दतीने सर्व परवानग्या मिळल्या. दीड वर्षात हे पूर्ण होऊन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्तेच पहिल्या विमानाचा शुभारंभ होईल, असा विश्वास व्यक्त करताना टर्मिनलवर बांबूपासून बनविलेले फर्निचर सर्वत्र पहायला मिळेल, असेही ते म्हणाले. 

श्रीमती पांडे यांनी प्रास्ताविक करुन सविस्तर माहिती दिली. यावेळी चित्रफितीमधून विमानतळाची माहिती दर्शविण्यात आली. मिरजोळे, शिरगाव ग्रामस्थ आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.