
सावंतवाडी : आरोसबाग येथे भूमी सुपोषण अभियानांतर्गत भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाला. अक्षय कृषी परीवार गेली अनेक वर्षे जमीनीचे सुपोषण व्हावे व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावे, विषमुक्त जमीन व शेती यासाठी भूमीपूजनाचे कार्यक्रम आयोजित करते. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग ग्रामविकास गतिविधिच्यावतीने आज हा कार्यक्रम श्रीक्षेत्र मंदिर आरोसबाग येथे योजला होता.
अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मूठभर माती आणली होती. त्याचे पूजन दादा नाईक यांच्या हस्ते करणेत आले.जमीन सुपीक व्हावी, किटकनाशके,रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेती करावी. प्लास्टीक व अन्य अविघटनकारी कचरा इतस्ततः फेकून किंवा जाळून जमीन,पाणी,हवा दूषीत करू नये. त्याचे दुष्परिणाम मानवी शरीरावर व अन्य सजीवांच्या शरीरावर होतात. त्यामुळे यापासून अलिप्त राहून जमीन व पर्यावरण यांची काळजी घ्यावी असे आवाहन व संकल्प उपस्थित मंडळीनी केला. या कार्यक्रमास शेर्ले उपसरपंच दीपक नाईक, दादा नाईक, महेश मिशाळ, सदानंद बांदेकर, हरीश्चंद्र बांदेकर, आपा नाईक, अक्षय म्हसकर, कौस्तुभ चांदेकर, लाभेश नाईक आदी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक अर्जुन चांदेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व सांगितले. संकल्पाने कार्यक्रमाची सांगता झाली.