घरकामवाल्या मुलीच्या लग्नात भास्करराव झाले हळवे..!

Edited by:
Published on: May 02, 2025 13:32 PM
views 163  views

चिपळूण : राजकारणातील कोकणची आक्रमक तोफ अशी ओळख असलेले शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव आपल्या कुटुंबासह , त्यांच्या घरी काम करणार्‍या सुप्रिया पाटील हिच्या लग्नासाठी उपस्थित होते. यावेळी नववधू ला आशिर्वाद देताना, भास्करराव हळवे झाले.

गुहागर तालुक्यातील पांगरी गावातील सुप्रिया पाटील गेली आठ वर्षे भास्करराव जाधव यांच्या घरी घरकामास होती. सुप्रियाने आपल्या वागणुकीने जाधव कुटुंबातील सर्वांची मने जिंकून आपलेसे केले. जाधव कुटुंबातील सर्वांनीच तीला आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य असे वागवले. भास्करराव आणि सौ.सुवर्णाताईंनी सुप्रियाला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले. आज १ मे रोजी सुप्रिया चे गुहागर तालुक्यातील पांगरी, सडेवाडी येथे लग्न झाले. सुप्रियाचे लग्न ठरविण्यापासून लग्न लागेपर्यंत च्या प्रत्येक टप्प्यावर जाधव कुटुंबाचा सहभाग होता. मुहुर्तावर विवाह आणि सात फेरे झाल्यानंतर, नववधू भास्कररावांची पत्नी सौ.सुवर्णाताईंचे आशिर्वाद घेण्यासाठी आली तेव्हा,  'तीने मुलगी आपल्या आईला बिलगावी' अशी मिठी सौ.सुवर्णाताईंना मारली आणि रडू लागली. यावेळी सौ.सुवर्णाताई आणि भास्करराव ही भावनाविवश झाले. त्यांनाही या मानस कन्येला आशिर्वाद देताना अश्रू आवरता आले नाहीत. त्यानंतर स्वतःला सावरत सौ.सुवर्णाताईंनी सुप्रियाची समजून घातली. स्वतःला सावरत , भास्कररावांनी सुप्रियाचा पती आणि सासरची मंडळींना, सुप्रिया माझ्या मुली सारखीच नव्हे, तर माझी मुलगीच आहे, ती लक्ष्मी आहे, तुमच्या घराची नक्की भरभराट करेल, त्यामुळे तुम्ही सुद्धा तीला मुलाप्रमाणे प्रेम द्या, असे सांगत नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. हे भावनाविवश दृष्य पाहून, विवाह मंडपात काहीकाळ शांतता पसरली होती.  तर उपस्थित सर्व अवाक् झाले होते. कारण कडक शिस्त आणि आक्रमक भास्करराव आजपर्यंत सर्वांनी पाहिले होते. त्यांच्यातील हळवेपण ही आज सर्वांनी अनुभववले.