
कुडाळ : कुडाळ रेल्वे स्थानककडे जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रस्त्याची व पुलाची उंची वाढवण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्याजवळ मागणी केली होती. या मागणीनुसार यावर्षीच्या बजेटमध्ये शिंदे - फडणवीस सरकारने ३ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे, अशी माहिती भाजपचे कुडाळ नगरपंचायत नगरसेवक तथा गटनेता विलास कुडाळकर यांनी दिली.
कुडाळ शहरातील रेल्वे स्थानकापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महेश आजगावकर ते ओहोळ्याच्या पुलापर्यंत रस्त्याची उंची कमी असल्यामुळे तसेच पुलाची रुंदी व उंची कमी असल्यामुळे पूर स्थिती निर्माण झाल्यावर रेल्वे स्थानक तसेच बांव, बांबुळी येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी रस्ता बंद होत होता. या पुराचे पाणी ओसरेपर्यंत थांबावे लागत होते. या रस्त्याची उंची तसेच पुलाची उंची वाढवण्यात यावी यासाठी भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच मागणी सुद्धा केली होती. या मागणीला सकारात्मक असा प्रतिसाद देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांनी २०२३-२४ या वर्षाच्या बजेटमध्ये रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रस्त्याची उंची तसेच पुलाची उंची वाढवण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारने ३ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
या विकास कामामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांसह बांव, बांबुळी गावातील ग्रामस्थांसाठी पावसाळ्यात हा रस्ता सोईचा होणार आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.