७२० कि.मी.चा समुद्रकिनारा मिळाला असला तरी....

अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली खंत
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 18, 2023 11:03 AM
views 54  views

कुडाळ : कोकणात मत्स्य विद्यापीठ आणि महामार्ग न होण्यास येथील राजकीय नेतृत्व कारणीभूत आहे अशी टीका माजी खासदार तथा अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. मत्स्य विद्यापीठ कोकणातच व्हावे यासाठी आपण आग्रही असल्याचे मत त्यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. कोकणाला जवळपास ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा मिळाला असला तरी नागपूर येथे मत्स्यविषयक कॉलेज आहे अशी खंत डॉ. मुणगेकर यांनी केली व्यक्त केली.

 मत्स्य विद्यापीठ आवश्यक असून याबाबत २०११ मध्ये सुद्धा आपण अहवाल सादर केला होता. परंतु, आजपर्यंत राज्य सरकारकडून याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. सध्या मत्स्य उत्पादन कोकणात कमी झाले आहे. मासेमारी असेल किंवा मत्स्यशेती यावर अभ्यास होणे गरजेचे आहे. १९६० पासून मत्स्य क्षेत्रावर कोणताही अभ्यास झालेला नाही. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जवळपास सव्वा तीन लाख मच्छीमार बांधव असून त्यांचे जीवन मासेमारीवर चालते. सध्या शास्त्रशुद्ध पद्धतीने मासेमारी व्यवसाय होणे गरजेचे आहे. कोकणातील अर्थव्यवस्था ही पर्यटन आणि मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. विदर्भात मत्स्य कॉलेज सुरू केले ही योग्यबाब जरी असली तरी दुसरे मत्स्य कॉलेज किंवा विद्यापीठ हे मालवणला व्हावे अशीही अपेक्षा यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली.