परमहंस भालचंद्र महाराज यांचा आजपासून पुण्यतिथी महोत्सव

Edited by:
Published on: December 04, 2024 13:00 PM
views 75  views

कणकवली : योगतपस्वी, कनकाधिपती परमहंस भालचंद्र महाराज यांचा 47 वा पुण्यतिथी महोत्सव बुधवार 4 डिसेंबर ते रविवार 8 डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी कनकनगरीत साजरा होणार आहे. या उत्सवाची संस्थानतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून बुधवारपासून पुढील पाच दिवस अवघी कनकनगरी भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे.  

साक्षात परब्रह्म असणारे देहत्यागानंतर समाधीरूपाने भक्तजनांच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पुर्ण करणारे विरक्त सन्यासी म्हणजेच भक्तांचे लाडके भालचंद्र बाबा. अशा या थोर तपस्वी भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला बुधवार 4 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. यानिमित्त पहाटे 5.30 ते 7.30 वा. समाधीपूजन, काकडआरती, सकाळी 8.30 ते 12.30 वा. सर्वभक्त कल्याणार्थ धार्मिक विधी -भालचंद्र महारूद्र महाभिषेक अनुष्ठान, दु. 12.30 ते 1 वा. आरती, 1 ते 3 वा. महाप्रसाद, 1 ते 4 वा. भजने, सायंकाळी 4 ते 7.30 वा. कीर्तन महोत्सव, रात्रौ 8 ते 8.15 दैनंदिन आरती असे कार्यक्रम होणार आहेत. 

तर रविवार 8 डिसेंबर रोजी परमहंस भालचंद्र महाराज यांचा 47 वा पुण्यतिथी दिन आहे. पहाटे 5.30 ते 8 वा. समाधीपूजन, काकडआरती, जपानुष्ठान,  सकाळी 8 ते 10.30 वा. भजने, सकाळी 10.30 ते 12.30 वा.समाधीस्थानी मन्यूसूक्त पंचामृत अभिषेक, दु. 12.30 ते 1 वा. आरती, दु. 1 ते 3 वा. महाप्रसाद, दु. 1 ते 5 वा. भजने, सायंकाळी 5 वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची भक्तगण व सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय यांच्यासमवेत कणकवली शहरातून भव्य पालखी मिरवणूक व नंतर आरती तर रात्रौ 11 वा. दशावतारी नाटक - पुण्यप्रभाव (भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ, हळवल) असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या पुण्यतिथी महोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे. 

कीर्तन महोत्सवात नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन

4 ते 7 डिसेंबर या कालावधीत सायंकाळी 4 ते 7.30 या वेळेत 9 वा कीर्तन महोत्सव होणार आहे. बुधवार 4 डिसेंबर रोजी कीर्तनकार ह.भ.प.श्री. लक्ष्मीप्रसाद शंकरराव पटवारी (रा. बीड)  विषय - शिव समर्थ योग, गुरूवार 5 डिसेंबर रोजी कीर्तनकार ह.भ.प. सौ. नम्रता व्यास निमकर (रा. पुणे) विषय- गावबा (संत एकनाथ महाराज), शुक्रवार 6 डिसेंबर रोजी कीर्तन चंद्रीका ह.भ.प. सौ. मानसी श्रेयस बडवे (रा. पुणे) विषय - ब्रम्हानंद महाराज, शनिवार 7 डिसेंबर रोजी कीर्तनकार ह.भ.प.श्री मोहक प्रदीप रायकर (रा. डोंबिवली) विषय- श्रीराम भक्त शबरी. अशी कीर्तने होणार आहेत.