
मुंबई : बेस्ट उपक्रमातून १ ऑगस्ट, २०२२ नंतर सेवानिवृत्त झालेल्या ४,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर देयके मिळालेली नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 'दि बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियन'चे कामगार नेते शशांक राव यांनी ही माहिती दिली आहे.
परळ येथे नुकत्याच झालेल्या बेस्टच्या सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सभेत या गंभीर समस्येवर चर्चा करण्यात आली. यावेळी कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि प्रशासनाने तातडीने देणी द्यावीत अशी मागणी केली.
बेस्ट प्रशासनाने १ ऑगस्ट, २०२२ नंतर निवृत्त झालेल्या ४,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांची प्रलंबित ग्रॅच्युइटीची रक्कम तात्काळ द्यावी. आणि जे कर्मचारी भविष्यात बेस्टच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना सेवानिवृत्तीच देय्य असलेली रक्कम तातडीने मिळावी. त्याचेबेस्ट प्रशासनाने योग्य नियोजन करावे.
कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले की, 'उपदान प्रदान अधिनियम, १९७२' आणि 'बेस्ट वर्कर्स युनियन'सोबत झालेल्या कराराचे बेस्ट प्रशासनाकडून उल्लंघन झाले आहे. युनियनने वारंवार पत्रव्यवहार आणि निवेदने देऊनही बेस्ट उपक्रमाने या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिलेली नाहीत. यामुळे अनेक कामगार सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे कामगार आता अधिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.