पाणीपट्टी, घरपट्टी वाढीविरोधात प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन!

माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी वेधले प्रशासनाचे लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: March 01, 2023 18:52 PM
views 227  views

सावंतवाडी : नगरपरिषद प्रशासनाने पाणीपट्टी व घरपट्टीत केलेल्या सरसकट वाढीविरोधात माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करत या करवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला. करवाढ रद्द न झाल्यास नगरपंचायतीवर धडक देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

नगरपरिषद प्रशासनाने पाणीपट्टी व घरपट्टीत दरवाढ केल्यान १०० युनिटला ३०० रू., १ हजार युनीटला ३ हजार रुपये, १० हजार युनीटला ३० हजार रुपये अशी वाढ होणार आहे. ही अन्यायकारक वाढ रोखली गेली पहिजे. त्यासाठी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी बुधवारी  घंटानाद करण्यात आला. ही दरवाढ रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ती प्रशासनाला रद्द करावीच लागेल. प्रांतांधिकारी यांनी भेटण्यासाठी उद्याची वेळ दिली आहे. या दरवाढीमुळे १ कोटी ७५ लाख रुपयांचा बोजा जनतेवर पडणार आहे. त्यामुळे ही रद्द झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला.

यावेळी उपस्थित माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनीही दरवाढीचा निषेध करत दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगांवकर, उमाकांत वारंग, माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, विलास जाधव, सुरेश भोगटे, संतोष तळवणेकर, रवी जाधव आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते.