
कुडाळ : तालुक्यातील ऐतिहासिक पाट माऊली मंदिराशेजारी असणाऱ्या प्रसिद्ध 'पाट तलावा'चे सुशोभीकरण आणि बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून, या प्रकल्पावरून आता दोन भिन्न प्रवाह समोर येत आहेत. आमदार निलेश राणे यांनी या प्रकल्पासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, १३ मे रोजी याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाले होते. मात्र, ठेकेदाराने काम सुरू करताना मार्गातील काही झाडे तोडल्यामुळे, या सुशोभीकरणावरून स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींमध्ये मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.
ग्रामसभेच्या मंजुरीने आणि शेतीच्या हितासाठीच काम: माजी सरपंच समाधान परब
या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना पाट गावचे माजी सरपंच समाधान परब यांनी सांगितले की, "या तलावाचे सुशोभीकरण आणि बंधारा दुरुस्तीचे काम ग्रामसभेमध्ये सर्वसहमतीने ठराव मंजूर करूनच हाती घेण्यात आले आहे. या तलावाच्या पाण्यावर कोचरा, म्हापण आणि पाट या तीन गावांची शेती अवलंबून आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने माती व फांद्यांचा वापर करून बंधारा घातला जायचा, परंतु आता ते शक्य नाही. २० वर्षांपूर्वी बांधलेल्या गेटवॉलमुळे शेतीत गाळ व माती जाण्यापासून रोखली जाते. तलावाच्या अस्तित्वासाठी 'रिटर्निंग वॉल' (संरक्षक भिंत) बांधणे अत्यंत गरजेचे आहे. प्रादेशिक विकास महामंडळाकडून मंजूर झालेल्या या कामात, केवळ वाहतुकीचा आणि कामाचा अडथळा दूर करण्यासाठी मार्गातील ५ ते ६ झाडे तोडण्यात आली आहेत."
निसर्गाला जपूनच विकास व्हावा: मंदार गावडे (पर्यावरणप्रेमी)
दुसरीकडे, पर्यावरणप्रेमी मंदार गावडे यांनी वृक्षतोडीवर आक्षेप घेत आपली बाजू मांडली. ते म्हणाले, "आमचा तलावाच्या सुशोभीकरणाला किंवा विकासाला अजिबात विरोध नाही. तुम्ही ३ कोटींऐवजी ६ कोटींचा निधी आणून काम करा, मात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड थांबवली पाहिजे. या नैसर्गिक तलावामध्ये स्थलांतरित पक्षी, कासव आणि कमळे आहेत. या जैवविविधतेचा अभ्यास करूनच काम करणे गरजेचे होते. बळजबरीच्या विकासामुळे निसर्गाचा ऱ्हास होऊन स्थानिकांनाच त्रास सहन करावा लागेल. तसेच, येथे येणाऱ्या काही हुल्लडबाज पर्यटकांमुळे कचरा आणि दारूच्या बाटल्यांचे साम्राज्य निर्माण होते. एमटीडीसीचे आधीचे प्रकल्पही निष्फळ ठरले आहेत. आम्ही या विरोधात कायदेशीर मार्गाने आवाज उठवू, पण जर पर्यावरणपूरक पद्धतीने काम होणार असेल तर आमची कोणतीही हरकत नाही."
एकीकडे तीन गावांतील शेतीचा पाण्याचा प्रश्न आणि तलावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर होत असलेले प्रयत्न, तर दुसरीकडे तलावातील नैसर्गिक अधिवास आणि पर्यावरण टिकवून ठेवण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी, अशा दोन्ही बाजू तूर्तास समोर आल्या आहेत. त्यामुळे विकासाची गरज आणि पर्यावरणाचे रक्षण या दोघांमध्ये समन्वय साधून हा प्रकल्प कसा पुढे जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










