
कणकवली : सावंतवाडी - कणकवली मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान सापडलेले सोन्याचे ब्रेसलेट संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रामाणिकपणे जमा करून महिला वाहकाने आदर्श प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे.
एसटीच्या सावंतवाडी-कणकवली बसमध्ये कार्यरत असलेल्या महिला वाहक जे. व्ही. कदम यांना बसमधील सीटवर सोन्याचे ब्रेसलेट आढळून आले. त्यांनी कोणताही मोह न बाळगता ते तात्काळ आपल्या ताब्यात घेऊन कणकवली आगारातील वाहतूक निरीक्षक श्री. परब यांच्याकडे सुपूर्द केले.
सदर ब्रेसलेट अंदाजे तीन लाख रुपये किमतीचे असल्याचे सांगितले जात आहे. ब्रेसलेट सुरक्षितपणे लिफाफ्यात सीलबंद करून ठेवण्यात आले असून, ज्यांचे हे दागिने असतील त्यांनी आवश्यक पुराव्यांसह कणकवली आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. महिला वाहकाच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक करण्यात येत आहे.










