प्रकल्पग्रस्तांसाठी आदर्श पुनर्वसन गावठाण उभारणार : पालकमंत्री

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्नही मार्गी लावणार
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 16, 2026 15:11 PM
views 39  views

वैभववाडी : अरुणा प्रकल्प पुनर्वसन गावठाणामध्ये नागरिकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या विकासकामांचे संपूर्ण श्रेय सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या प्रकल्पग्रस्त आणि ग्रामस्थांचे असल्याचे प्रतिपादन मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लावून पुनर्वसन गावठाण आदर्श बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भोम पुनर्वसन येथे उभारण्यात आलेल्या नूतन बुद्धविहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भोम बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर भाजपा वैभववाडी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, नासीर काझी, साची कोलते, प्रकाश पाटणकर, दिलीप तळेकर, बंड्या मांजरेकर, प्राची तावडे, डॉ. जगन्नाथ जामदार, शारदा कांबळे, सुवर्णा संसारे, राजेंद्र राणे, विजय तावडे, महेश संसारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री  राणे म्हणाले, “पुनर्वसन भागात आल्यानंतर एखाद्या मोठ्या शहरात आल्याचा भास होतो. शासनाच्या माध्यमातून येथे दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. हा विकास सहज झालेला नसून त्यामागे प्रकल्पग्रस्तांचा सातत्यपूर्ण संघर्ष आणि पाठपुरावा आहे. भोम पुनर्वसनमध्ये उभारण्यात आलेले सुसज्ज बुद्धविहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे समाजासाठी प्रेरणादायी ठरेल.”तसेच, पुनर्वसन गावठाणातील उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेण्यात येणार असून प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बुद्धविहाराच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. तर बुद्धमूर्तीचे लोकार्पण प्रकाश पाटणकर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अभय कांबळे यांनी केले. तर शारदा कांबळे आणि भालचंद्र साठे यांनी मनोगत व्यक्त केले.