
मालवण : कचरा जाळताना लाकडी साहित्य जळाल्याच्या वादातून मेढा येथील दोघा बहीणींना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार करण रवींद्र कुबल आणि योगेंद्र रवींद्र कुबल या दोघा तरुणांवर मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांही संशयितांना मालवण पोलिसांनी अटक करून शुक्रवारी मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यँत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील तुषार भणगे यांनी काम पाहिले. झालेल्या मारहाणीत हर्षाली हरेश सारंग व सोनाली देवराज कुबल या जखमी झाल्या. हर्षाली हिच्या डोक्याला तर सोनाली हिच्या हाताला दुखपत झाली. मारहाणीत हर्षाली बेशुद्ध पडली होती. या दरम्यान करण व योगेंद्र यांनी गळ्यातील मंगळसूत्र, चैन असे एकूण एक लाख किंमतीचे दागिने ओढून नेल्याचे हर्षाली हिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज झांजुर्णे अधिक तपास करत आहेत.