पर्यटन जिल्ह्यात पर्यटकांशी सौजन्यपूर्ण वागा | पालकमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सूचना
Edited by: देवयानी वरसकर
Published on: April 11, 2023 17:46 PM
views 104  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे.  या जिल्ह्यामध्ये विविध भागातून पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांना पोलीस दलाने सौजन्यपूर्ण आणि मदतीची वागणूक द्यावी. जेणेकरुन जिल्ह्याचा नावलौकिक पर्यायाने पोलीस दलाची प्रतिमा आणि पर्यटन वाढेल, अशी सूचना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली.

पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. सुरुवातीला पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये मनुष्यबळ, गुन्ह्यांची उकल, पोलीस दलाकडे असणारी साधन-सामग्री, महिलांविरोधी गुन्हे रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजना, सागरी पोलीस ठाण्यांकडे असणारी साधन-सामग्री, रिक्त पदे, रेस्कू ऑपरेशन, नवी पर्यटन पोलीस योजना, कॅराव्हॅन, सागर किनारी गस्ती नौका आदीबाबत सविस्तर माहिती दिली. 

पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, पोलीस दलाने प्रलंबित सायबर गुन्ह्यांची उकल करावी. जिल्हा शंभर टक्के सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहनियंत्रणाखाली आणण्यासाठी लोकसहभागाची मदत घ्यावी. त्याबाबत नियोजन करावे. लोकसहभागामुळे जनजागृती होवून चांगला परिणाम होवू शकतो. पोलीस दलाला आवश्यक असणाऱ्या वाहनांसाठी निश्चितपणे निधी दिला जाईल. त्यासंदर्भात प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव पाठवावेत.

ते म्हणाले, सायबर गुन्ह्यांमुळे सर्वसामान्य लोकांची फसवणूक होत असते. असे प्रलंबित गुन्हे मार्गी लावावेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे.  या जिल्ह्यामध्ये विविध भागातून पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांना पोलीस दलाने सौजन्यपूर्ण आणि मदतीची वागणूक द्यावी. जेणेकरुन जिल्ह्याचा नावलौकिक पर्यायाने पोलीस दलाची प्रतिमा आणि पर्यटन वाढेल. या बैठकीला पोलीस दलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.