सावध व्हा ! आपले पाल्य देखील ड्रग्सच्या व्यसनात अडकू शकते : डाॅ. रुपेश पाटकर

दोडामार्ग पोलीस स्टेशनची ड्रग्स विरोधी मोहीम
Edited by: भगवान शेलटे
Published on: January 25, 2024 15:32 PM
views 83  views

दोडामार्ग : ड्रग्सचे व्यसन हे घातक व्यसन असून ते कोणालाही लागू शकते. ते आपल्या घरात पोचू नये यासाठी आपल्या कुमारवयीन मुलांना जपा, असे आवाहन मनोविकारतज्ज्ञ डाॅ.रुपेश पाटकर यांनी आडाळी येथील सभेत केले. दोडामार्ग पोलीस स्टेशन व आडाळी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दोडामार्ग पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरूण पवार, आडाळी सरपंच पराग गावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. पाटकर म्हणाले की कोणीही व्यसनग्रस्त व्यक्तीची पहीली सुरुवात दारू वा तंबाखूजन्य पदार्थांनी होते. ही व्यसने मुलांची भिड मोडायला कारण ठरतात, त्यामुळे त्यांना गेटवे ड्रग्स म्हणतात. त्यांची चव माणसाने कधीच न चाखणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की कुतूहल, गंमत, मित्रांचा दबाव, कौटुंबिक कलह ही मुलांनी ड्रग्सकडे वळण्याची प्रमुख कारणे आहेत. ती टाळण्यासाठी तुमच्या पाल्यात ठामपणा येणे गरजेचे आहे.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक अरूण पवार म्हणाले की पूर्वी गोव्यात असणारे हे व्यसन आता आपल्या जिल्ह्यात पाय पसरू लागले आहे, त्यामुळे आपण सावध होण्याची गरज आहे. आपल्या जिल्ह्यात प्रामुख्याने गांजाची तस्करी आढळत असून हे पदार्थ मिळवण्यासाठी व्यसनी माणूस वाटेल त्या थराला जाऊ शकतो. पुढे व्यसन वाढून गुन्हेगारी वाढण्यापेक्षा आजच आपण हे टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सरपंच पराग गावकर यांनी केले. यावेळी आडाळी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.