
सावंतवाडी : शहरातील ऐतिहासिक मोती तलाव काठावरील पादचारी मार्ग खचत आहे. येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान समोरील फुटपाथ खचला आहे. यामुळे मॉर्निंग, इव्हीनिंग, नाईट वॉकला येणाऱ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे.
शिव उद्यान समोरील हा पदाचारी मार्ग खचत चालला आहे. तसेच मोती तलावाचा दगडी बांधकाम असलेला काठ देखील खचला आहे. येथे मॉर्निंग, इव्हीनिंग, नाईट वॉकला ज्येष्ठ, महिलांसह शेकडो नागरिक येतात. दररोजचा वर्दळीचा हा मार्ग आहे. त्यामुळे या भागात नगरपरिषद प्रशासनान वेळीच उपाययोजना करून अनर्थ टाळावा अशी मागणी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यापूर्वी या शेजारील भाग सिमेंट कॉक्रीटचा वापर करून नव्याने बांधला होता. येथील काठाचा वरचा भाग देखील नव्यानं बांधला होता. मात्र, आता पादचारी मार्ग खचत चालला असून दुर्घटना घडण्यापुर्वी प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.