देवगडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 29, 2023 19:54 PM
views 142  views

देवगड : देवगड तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची  रणधुमाळी सुरु झालीअसून ठाकुरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद बिनविरोध निवडुन आले, तर उर्वरित आठ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 18 उमेदवार रिंगणात असून, तिर्लोट व फणसगाव या ग्रामपंचायीच्या सरपंच पदासाठी तिरंगी लढत तर बाकि सहा ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढती होणार आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकिमधील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या तिर्लोट ग्रामपंचायतीमधील भाजपा विरुध्द उबाठा सेना व शिंदेगटामध्ये तिरंगी लढत होणार आहे. मात्र या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी भाजपा विरुध्द उबाठा शिवसेना यांच्यामध्येच लढती होणार आहेत.

देवगड तालुक्यामध्ये 9 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून यासाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे. यामध्ये तिर्लोट,रामेश्वर,विठठलादेवी,वळीवंडे,वानिवडे,ठाकुरवाडी,शिरवली,पावणाई,फणसगाव या ग्रामपंचातीचा समावेश आहे. ठाकुरवाडी ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणुक बिनविरोध झाली.या ठिकाणी अनिका अ.कादिर मणचेकर या सरपंच पदासाठी बिनविरोध झाल्या आहेत. तर वळीवंडे ग्रामपंचायतीमधील सरपंच पदासाठीच निवडणुक होणार आहे. मात्र सदस्य पदासाठी सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तालुक्यामधील सर्वाधिक महत्वाची समजली जाणारी तिर्लोट ग्रामपंचायतीची निवडणुक लक्षवेधी ठरत आहे.

या निवडणुकि मधील सरपंच पदासाठी ना.मा.प्र महिला आरक्षण पडले असून भाजपातर्फे रितिका जुवाटकर,उबाठा सेनेतर्फे मानसी सारंग, शिवसेना शिंदेगटामधून अमिक्षा घाडी यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. उबाठा सेनेचे माजी पंचायत समिती सदस्य सुनिल तिर्लोटकर हेही तिर्लोट ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणुक लढवित आहेत. यामुळे उबाठा शिवेसेनेला हि अस्तित्वाची तर भाजपाला प्रतिष्ठेची निवडणुक लढविली जात आहे. तसेच फणसगाव ग्रामपंचायतीमध्येही सरपंच पदासाठी शितल पाटील,देवयानी मेस्त्री,दिपाली मेस्त्री यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे, तर रामेश्वर विठठलादेवी,वानिवडे,वळीवंडे,शिरवली,पावणाई या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी भाजपा विरुध्द उबाठा सेना अश्या दुरंगी लढती होणार आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवरती असल्यातरीही या ग्रामपंचायतीमध्ये पक्षीय स्वरुप असले तरी स्थानिक उमेदवार कश्या स्वरुपाच्या आहेत. त्यांचे कार्य गावातील लोक पक्ष न पाहता मतदार करीत असतात.

यामुळे बहुतांश राजकिय पक्ष ग्रामपंचायतीच्या‍ि निवडणुकांमध्ये गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा शोध घेवून त्यांना उमेदवारी देण्यासाठी प्रत्येक पक्षाची हालचाल सुरू असते. त्याच दृष्टीकोनातून देवगड तालुक्यामध्ये 9 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकिंमध्ये काहि ग्रामपंचायतीचे सदस्य पदामधील उमेदवार काहि प्रतिष्ठीत व्यक्ती असल्याचे दिसून येत आहेत. मात्र राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. प्रचाराची रणधुमाळी हि गावागावात वाढली आहे. मात्र या ग्रामपंचायतीमधील निवडणुका या पाणी व रस्ते हेच मुददे घेवून लढविले जाते. सद्या देवगड तालुक्यामधील जलजीवन मिशन नळपाणी योजनेची कामे मोठया प्रमाणात चालु आहेत. हि कामे आपणच मंजुर करुन आणली असल्याचे प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी सांगुन तसा गावामध्ये प्रचार करीत आहेत. तसेच या 9 ग्रामंपचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबर काहि ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकाही लागल्या आहेत. यामध्ये इळये,गोवळ या ग्रामपंचायतीच्या दोन सदस्य पदांसाठी निवडणुक होत आहेत.