बापरे...तर सावंतवाडीच होईल वाळवंट !

पावसाच्या आगमनाकडे चातकासारखे लागलेत डोळे
Edited by:
Published on: June 08, 2023 10:58 AM
views 155  views

सावंतवाडी : महाराष्ट्रात फायद्यात चालणारी गुरुत्वाकर्षणावर आधारित अशी पाणी पुरवठा योजना सावंतवाडीत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणानं तळ गाठलाय. अद्याप पावसाचा सुद्धा पत्ता नसून मिरग देखील सुका गेलाय. त्यातच मोती तलाव कोरडा केल्यान शहरातील विहीरी आटल्या आहेत. बारमाही भरून वाहणाऱ्या आत्मेश्वरतळीनं तळ गाठलाय. त्यामुळे दोन दिवसांत वरूणराजा बरसला नाही तर सावंतवाडीकरांना पाण्यासाठी युद्ध करावं लागणार आहे. मोजकाच व काहीच दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या शहरातील काही भागात बंबान पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे.


येत्या दोन दिवसांत पाऊस न पडल्यास सावंतवाडीकरांना पाण्याचा मोठ्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पाळणेकोंड धरणाची पाहणी केली असता पाण्याचा पातळीत झालेली घट दिसून आली. त्यामुळे त्यांनी शहरवासीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


काही वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु १५ जुलै पर्यंत कमी अधिक दाबाने पाणीपुरवठा शहरांमध्ये होत होता. येथील नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा अपव्यय टाळावा जेणेकरून मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या निर्माण होणार नाही असा सतर्कतेचा संदेश माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.