
सावंतवाडी : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आलं. सावंतवाडी शहरात मोती तलावाच्या काठावर तर ग्रामीण भागात नदी नाल्यात गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. तालुक्यातील ग्रामीण भागात पाच दिवसांच्या गणपतींसह गौरी-गणपतींच वाजत गाजत, फटक्यांची आतषबाजी करत विसर्जन करण्यात आलं.
विसर्जनस्थळी आरती, गाऱ्हाणं घालत पुढच्या वर्षी लवकर ये अशी साद गणराला घालण्या आली. ग्रामीण भागात एकत्रितपणे गणेश विसर्जनाचा जल्लोष दिसून आला. डोक्यावरून मुर्ती विसर्जन स्थळी नेण्याची परंपरा जोपासली जातं आहे. पाच दिवसांच्या गणपतींसह गौरी-गणपतींच वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं. सावंतवाडी शहरात मोती तलावाच्या काठावर तीन ठिकाणी गणेश विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून विद्युत रोषणाई व मोती तलावाच्या काठावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच फुलांनी तलाव काठ सजविण्यात आला. कोल्हापूर येथील खास पथक यासाठी सावंतवाडीत दाखल होते. केसरकर यांनी केलेल्या या उपक्रमाचे गणेशभक्तांनी कौतुक केलं.
दरम्यान, रात्री उशिरा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोती तलावाच्या विसर्जन स्थळांना भेटी देत गणरायाचा आशीर्वाद घेतला. गणेश विसर्जनात ते सहभागी झाले. सावंतवाडी तालुक्यात सात, नऊ, अकरा दिवस गणपतींचा उत्साह घरोघरी पहायला मिळत आहे. पावसाचा व्यत्यय असताना देखील गणेशभक्तांच्या उत्साहात मात्र कोणतीही कमतरता दिसून येत नाही आहे.