
देवगड : देवगड तालुक्यातील बापर्डे गावाचे सरपंच संजय लाड यांनी बापर्डे गावात नाविन्यपुर्ण उपक्रम राबवत मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत वनराई बंधारा बांधून बंधाऱ्यावरच वाढदिवस साजरा केला.
बापर्डे गावात हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबवत राज्यात वेगळा ठसा त्यांनी उमठवला आहे. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री समृध्दी पंचायत राज अभियानातही राज्यात बापर्डे गावाने पुरस्कार प्राप्त करावा यासाठी नाविन्यपुर्ण उपक्रम रावबत असुन त्याच अनुषंगाने आपला वाढदिवस वैयक्तिक सोहळ्यापासून दूर राहत,एका अतिशय स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणाऱ्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यांनी ‘मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान’ अंतर्गत गावात वनराई बंधारा बांधून थेट त्याच बंधाऱ्यावर आपला वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा पायंडा पाडला.त्यांच्या या उपक्रमामुळे जलसंधारणाच्या कामाला प्रोत्साहन मिळाले आहे.
सरपंच संजय लाड यांच्या या अभिनव उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उपक्रम यशस्वी केला. या नाविन्यपुर्ण उपक्रमाला पंचायत समिती देवगड कृषी अधिकारी दिगंबर खराडे, विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दीपक तेंडुलकर,ग्रामपंचायतअधिकारी घुनावत हे विशेषत्वाने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला उपसरपंच गुणवंत राणे, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप नाईक धुरे, पोलीस पाटील विवेक वेद्रुक, अनघा राणे, जीवन नाईक धुरे, अजित राणे आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहून सरपंचांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात गावातील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, शिक्षक वर्ग, आरोग्य कर्मचारी, बँक कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याचप्रमाणे जिजामाता ग्रामसंघ आणि आशा ग्रामसंघ या महिला बचत गटांच्या पदाधिकारी व महिलांनी उपस्थित राहिल्या.
सरपंच संजय हनुमंत लाड म्हणाले, "वाढदिवस साजरा करताना आपल्या गावाला आणि पर्यावरणाला काहीतरी योगदान देता आले, तर त्याचे खरे समाधान मिळते. मुख्यमंत्री समृद्धी अभियानातून जलसंधारणाचे काम करणे, ही काळाची गरज आहे. या वनराई बंधाऱ्यामुळे गावातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असुन हेच खरे यश आहे.
विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दीपक तेंडुलकर व कृषी अधिकारी दिगंबर खराडे यांनीही सरपंचांच्या या कृतीचे विशेष कौतुक केले. "सरपंचांनी आपला वाढदिवस जलसंधारणाच्या कामाशी जोडून इतरांना एक प्रेरणादायी संदेश दिला आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यास, गावे खऱ्या अर्थाने 'समृद्ध' होतील," असे मत त्यांनी व्यक्त केले.
बापर्डे सरपंचांचा हा वाढदिवस केवळ एक वैयक्तिक सोहळा न राहता, तो सामाजिक जबाबदारी आणि जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे.











