
नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमधील हंगामी सरकार शपथ घेणार आहे. लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-जमान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हंगामी सरकारचा शपथविधी आज गुरुवारी रात्री ८ वाजता होण्याची शक्यता आहे. सरकारच्या सल्लागार समितीत १५ सदस्यांचा समावेश असल्याचे लष्करप्रमुख जमान यांनी सांगितले. तर, पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी युनूस गुरुवारी पॅरिसहून बांगलादेशमध्ये परतणार असल्याचीही सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण प्रणालीवरून सरकारविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला. त्यांनी देशातून काढता पाय घेतल्याच्या एका दिवसानंतर, मंगळवारी ८४ वर्षीय अर्थतज्ज्ञ युनूस यांची राष्ट्रपती महम्मद शहाबुद्दिन यांनी हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. मोहम्मद युनूस यांनी सर्वांना शांत राहण्याचे आणि सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.