बांदेश्वर मंदिर कलशारोहण सोहळा वर्धापनदिन उत्साहात

Edited by:
Published on: May 06, 2024 13:41 PM
views 259  views

बांदा : बांदा येथिल प्रसिद्ध जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याच्या आठव्या वर्धापनदिनी रविवार हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवून सोहऴ्यात सहभाग घेतला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते. रविवार सकाळी गणपती पूजन, देवतास नारळ, विडे अर्पण करुन सामुदायिक गाऱ्हाणे करुन सोहऴ्यास आरंभ झाला. सकाळी ८.३० ते दु. १.०० या वेळेत श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्राभिषेक अनुष्ठान, श्री देवी भूमिका मंदिरात श्री सुक्त आवृत्ती अनुष्ठान, श्री गणेश मंदिरात गणपती अर्थवशिर्ष आवृत्ती जप अनुष्ठान आदी धार्मिक अनुष्ठाने करण्यात आली.

त्यानंतर देवतांना नैवेद्यार्पण करुन भाविकांच्या उपस्थितीत श्री बांदेश्वर मंदिर, श्री भुमिका मंदिर व श्री गणेश मंदिरात महाआरती करण्यात आली. सर्वांच्या कल्याणासाठी श्री बांदेश्वराला तसेच पंचायतनातील सर्व देवतांना ब्राम्हण व मानकरी यांच्याद्वारा गाऱ्हाणे घालून महाप्रसादास आरंभ झाला. हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. सकाळी परदेशी पार्यटकांनी देखील श्री बांदेश्वर भूमिकेचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.

सायंकाळी स्थानिक मंडळांची भजने तसेच युवा किर्तनकार ह. भ. प. आर्या मंगलदास साळगांवकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम तर रात्रौ श्रींच्या सवाद्य पालखी सोहळा आदी कार्यक्रम संपन्न झालेत. हजारो भाविकांनी श्री दर्शनाचा व धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला.