
सावंतवाडी : खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदाच्या कँटीनमध्ये सायंकाळी अचानक स्फोट झाला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या स्फोटानंतर कँटीनमध्ये आगीचा मोठा भडका उडाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने स्फोटाच्या वेळी कँटीन बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग लागल्यानंतर काही वेळातच परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीचे कारण आणि स्फोटामागील कारणांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे शाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.










