पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य संकलन

Edited by:
Published on: October 01, 2025 17:44 PM
views 69  views

बांदा : ज्ञानदेवतेच्या पूजनाच्या पारंपरिक उत्सवाला यंदा सामाजिक भानाची जोड मिळाली. जिल्हा परिषद पीएम श्री बांदा नं. १ केंद्रशाळेत शारदोत्सवाच्या निमित्ताने पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शाळकरी मुले, पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

दरवर्षीप्रमाणे शाळेत सरस्वती पूजनाचा कार्यक्रम पार पडला; मात्र यंदा देवीला फुलाऐवजी वही, पेन, पेन्सिल, रंगसाहित्य, चित्रकला वही असे शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ग्रामपंचायत सरपंच प्रियांका नाईक, सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, तसेच सहजसेवा सेवायोग परिवार बांदा यांनी या उपक्रमाला सहकार्य केले.

मोठ्या प्रमाणावर जमा झालेले साहित्य उमेद फाउंडेशनच्या माध्यमातून धाराशिव, बीड, सोलापूर आणि उस्मानाबाद या पूरग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक जे.डी. पाटील यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी लहानपणापासून सामाजिक भान ठेवावे यासाठी हा प्रयत्न आहे. पुढील काळात स्थानिक उत्सव मंडळे आणि देवस्थान समित्यांच्या सहकार्याने याच धर्तीवर उपक्रम राबवण्याचा मानस आहे.”

मुख्याध्यापक शांताराम असनकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, शिक्षक व सदस्य यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. या उपक्रमातून शारदोत्सवाचा सामाजिक संदेश अधोरेखित झाला – विद्यार्थ्यांनी केलेली अर्पणे ही देवीला अर्पण होऊनही, गरजवंतांसाठी खरी संपत्ती ठरली.